बाळासाहेब शिंत्रे

📖 जीवन तरंग

आत्मचरित्र – आठवणींचे राजवस्त्र

जीवन तरंग - पुस्तकाचे मुखपृष्ठ (Front Cover)
मुखपृष्ठ (Front Cover)
जीवन तरंग - पुस्तकाचे मलपृष्ठ (Back Cover)
मलपृष्ठ (Back Cover)

"जीवन प्रवासातल्या आठवणी.. जणू काही मी विणायला घेतल्या. प्रश्न पडला, 'कोणते धागे घ्यायचे?' एक-दोनच की सगळेच वापरायचे ?

म्हटलं एक काय, दोन काय.. वेचकच घेऊ. आधी विणू तर खरं. उमलली स्मृतींची हळवी फुले. एक धागा आशेचा, सुखाचा आनंदाचा.. दुसरा निराशेचा, दुःखाचा, अपयशाचा. सरळ, वाकडे, उभे, आडवे, तिरपे, बहुढंगी... सफेद, काळे, निळे, पिवळे, बहुरंगी. सगळेच कसे छान, सुंदर, प्रसन्न होते.. सगळेच माझ्याशी प्रेमांनी बोलत होते.

विणत गेलो तनमनाने, उल्हासाने.. गुंफण केली नाजूक तशी हळुवारपणे. धागे धाग्यात आपसूकच गुंफत गेले.. लक्षात आलं, वस्त्र आता आकारू लागलेलं... तरीही अजून काहीतरी बाकी राहिलेलं.

मी गुंफलेल्या या माळेतील अक्षरं माझ्या अंतकरणाच्या अंतःकोषाला स्पर्श करून जन्माला आली आहेत."

पुस्तकाविषयी

कोरोनाच्या टाळेबंदीच्या काळात (मार्च २०२० पासून) घरात मिळालेल्या विश्रांतीच्या क्षणांत मी माझ्या आयुष्यातील आठवणींना उजाळा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आतापर्यंत पैशांचा हिशोब केला, आता आठवणींचा हिशोब जुळवला. हे पुस्तक म्हणजे केवळ एका व्यक्तीचा जीवनपट नाही, तर युवा पिढीला कठीण प्रसंगांवर मात करत यशाचे शिखर गाठण्यासाठी दिशा देणारे आहे.

प्रकाशन: ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्राध्यापक प्रवीण दवणे यांच्या हस्ते – दि. १२ डिसेंबर २०२१, गुरव ज्ञानी हॉल. पुस्तकाला पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे शब्दरूपी आशीर्वाद लाभले आहेत.

💬 वाचक प्रतिक्रिया

'जीवन तरंग' वाचून भारावलेल्या विविध क्षेत्रातील वाचक आणि सहकाऱ्यांचे मनोगत

श्री. व्ही. डी. पाटील

श्री. व्ही. डी. पाटील

अध्यक्ष, आर.सी.एफ. एक्स-एम्पलॉइज सोशल फोरम

दि. १४-१२-२०२१

प्रिय मित्र श्री बाळासाहेब शिंत्रे,

सप्रेम नमस्कार,

आपले 'जीवन तरंग' आत्मचरित्र काल वाचण्यास सुरुवात करावयाचे ठरवून हळूहळू २०-२५ दिवसांत संपवू असे ठरवले होते, परंतु आपण हे इतक्या चांगल्या तऱ्हेने लिहिले आहे की ते पूर्ण पुस्तक एका दिवसात बाकी सर्व कामे बाजूला ठेवून, वाचून काढले. आपण आपल्या आयुष्याचा जीवनपट उलगडताना जीवनातील वैशिष्ट्यपूर्ण घटनांचे सुंदरमणी आठवणींच्या धाग्यांमध्ये गुंफून कोल्हापुरी साज सादर केला, त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन.

आपले आत्मचरित्र वाचताना ६०-७० वर्षांचा माझ्या आयुष्याचा कालखंडच आपण पाहतो आहे व त्याला उजाळा मिळतो आहे असे वाटले. खरंतर माझा जीवन प्रवास तुमच्या अगोदर ९-१० वर्षांचा पण घटनाक्रम सर्वसाधारण तसाच. शेतकरी कुटुंबामध्ये ग्रामीण भागात जन्म, आर्थिक विवंचना, सोयी-सुविधांचा अभाव, त्यातून शिक्षणाबद्दल पालक-नातेवाईक यांना अज्ञानामुळे काहीच महत्व वाटत नसे. योग्य मार्गदर्शनाचा अभाव, त्यातून मार्ग काढत शिक्षण पूर्ण करून, एफ.सी.आय तथा आर.सी.एफ. सारख्या उत्कृष्ट कंपनीमध्ये काम करून भविष्य घडवण्याची संधी, त्यासोबत नातेसंबंध, मित्रपरिवार, जन्मभूमीबद्दल असणारे प्रेम व ओढ. जुन्या नव्यांचा समतोल सांभाळणे हे आपण ज्या सुंदरतेने साहित्यिक भाषेमध्ये सादर केले, त्यामुळे हे पुस्तक वाचताना उत्कटता शिगेला पोहोचते. त्यामुळेच हे पुस्तक एका दिवसात वाचून पूर्ण केले. आपण खूप कष्टाने, मेहनतीने सुंदर कलाकृती निर्माण केली, याबद्दल पुनश्च अभिनंदन!

आपला स्नेहांकित,
श्री. व्ही. डी. पाटील

व्ही. डी. पाटील यांचे हस्तलिखित पत्र
श्री. व्ही. आर. खर्चे

श्री. व्ही. आर. खर्चे

निवृत्त ट्रेनिंग मॅनेजर, आर.सी.एफ.लि.

श्री शिंत्रे साहेब,

आपले जीवन तरंग' हे आत्मचरित्रात्मक पुस्तक वाचले. आपले संपूर्ण बालपण खेड्यामध्येच गेले. तेथेच आपण आपले प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण तसेच महाविद्यालयीन शिक्षण सुध्दा कोणत्याही प्रकारच्या चांगल्या श्री नसताना पूर्ण केलेत. हे सर्व आपल्या मनात असलेल्या शिक्षणाबद्दलची आवड आणि जिद्दीमुळेच ! शुभचिंतकांचीही सोबत आपल्याला होतीच!

या पार्श्वभूमीवर आजच्या विद्यार्थ्यांच्या पिढीबद्दल एक विचार – कंत मनात डोकावली. आपल्याप्रमाणे आजच्या विद्यार्थ्यांनी एवढे कष्ट, मेहनत घेतली तर निश्चितच ते अमेरिका स्थित नासा किंवा भारताच्या इस्रो मध्ये असतील. परंतु सर्व सुविधा पायाशी लोळण घेत असून देखील आजचा विद्यार्थी अशा प्रकारची मेहनत घेताना दिसत नाही अशा या पिढीसाठी आपले हे पुस्तक निश्चितपणे प्रेरक आणि दिशादर्शक ठरेल, यात शंका नाही.

लक्ष्मी प्रमाणे सरस्वतीच्या देखील वरदहस्त आपणावर आहेच. तसे आपण वाणिज्य शाखेचे पदव्युत्तर पदवीधर! आयुष्यभर आपण पैसा आणि मालमत्तेची बेरीज वजाबाकी केली आणि आता आयुष्याच्या उत्तरार्धात मराठी साहित्यरूपी मोठ्या पर्वतावर आरोहण आरंभिले; निश्चितच ही बाब आशय आश्चर्य आणि कौतुकास्पद अशीच आहे.

एकदरीत पंचविस वर्षांपर्यंत आपण सर्वजण C2/7 मध्ये एकत्र कुटुंबाप्रमाणे सोबत राहिलो. तो आनंद विशेषच होता. तेव्हा आम्ही बघत असू की आपल्याकडे आपल्याकडे नेहमीच पै-पाहुण्यांची वर्दळ असायची. अशी पाहुण्यांची घरामध्ये ये-जा असणे म्हणजे गृहलक्ष्मीची कृपा की! अन्यथा हे शक्य नाही.

काही काळानंतर आपल्या अर्धांगिनी सौ. रंजना शिंत्रे ह्या नगरसेविका म्हणून निवडून आल्यात. तेव्हा येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ तर आणखीच वाढली. शिवाय चहा पाण्याविना कोणीही परतत नसे, हे सुद्धा आम्ही बघितलेले आहे. त्या नगरसेविका झाल्यामुळे आपल्या सुद्धा जबाबदाऱ्या वाढल्या.

बघता बघता हर्षदा, मिलिंद ही दोन्ही मुलं महाविद्यालयीन शिक्षण घेऊ लागले. वाढत्या वयाप्रमाणे मुलांचे विचार देखील बदलतात, परंतु आपली मुले ह्या गोष्टीला अपवाद ठरलीत. ते हसत खेळत तुमच्या दिनचर्यामध्ये मदत करायचे. माझ्या शिक्षकी स्वभावानुसार मी त्यांच्याकडे चौकशी करायचं तेव्हा ते सांगायचे बाबा अजून ऑफिसमधून आले नाहीत, आई कुठे मीटिंगला गेलेली आहे इत्यादी आणि हे सुद्धा अगदी आनंदी चेहऱ्याने!

आपली लेखा विभागाची नोकरी म्हणजे मोठी जबाबदारीच. अशी असून देखील आपण समाजकार्यासाठी वेळ दिला. नोकरीमध्ये सुद्धा भरपूर प्रगती केली.

आपल्या C2 अपार्टमेंट असोसिएशनच्या अकाऊंट आणि ऑडिट सुरुवातीपासूनच लक्ष घातले. आपण आपल्या सौभाग्यवती आणि दोन मुले अशा कुटुंबातील एकंदर चारही व्यक्ती समाजकार्यामध्ये असायच्या. आज रोजी आपण उभयता शिवसेने मध्ये पक्षाची फार मोठी जबाबदारी पार पाडत आहात. त्यांचा आम्हा सर्व समाजबांधवांना मोठा अभिमान वाटतो.

असीच समाजसेवा आणि लेखन कार्य आपणाकडून होऊन आपण यशोशिखर गाठावे आणि त्यासाठी आपणाला दीर्घायुष्य आणि निरामय आरोग्य लाभावे. हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आणि शुभेच्छा.

श्री. व्ही. आर. खर्चे

व्ही. आर. खर्चे यांचे हस्तलिखित पत्र – पृष्ठ १ व्ही. आर. खर्चे यांचे हस्तलिखित पत्र – पृष्ठ २
सुरेश घाडगे

श्री. सुरेश घाडगे

निवृत्त उप महाप्रबंधक प्रबंधक, आर.सी.एफ.लि.

वाचनाच्या बाबतीत मी खूप आळशी आहे. रोजचं वृत्तपत्र देखील मी पूर्णपणे कधी वाचत नाही. सकाळी आलेला लोकसत्ता उलटासुलटा करून ठळक बातम्या बघतो. खेळांच्या बातम्यावर नजर फिरवतो व नंतर संपादकीय पानावर काही आवडीचा लेख, उलटाचष्मा सदर बघतो व ठेवून देतो. हायस्कूलच्या जीवनात वि. स. खांडेकरांच्या काही कादंबऱ्या न थांबतां वाचून काढलेल्या आठवतंय. पण नंतर सायन्स स्ट्रीमला गेल्यामुळे तेही वाचन बंद झालं ते जवळजवळ निवृत्त होईपर्यंत. आता थोडावेळ वाचनास देत असतो व काही मनास उभारी वा प्रेरणादायी विदेशी लेखकांची पुस्तके वाचत असतो.

मराठीतलं म्हटलं तर परवा परवा "जीवन तरंग" हे पुस्तक आमच्या परममित्राने पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आमच्या हाती ठेवले. प्रकाशन सोहळा नामांकित साहित्यिक प्रवीण दवणे यांच्या हस्ते झाला होता व त्या पुस्तकातील महत्वाचे उतारे वाचून प्रवीण दवणेंनी आमच्या मित्राचे जवळजवळ पस्तीस ते चाळीस मिनिटे दिलखुलास कौतूक केलं होतं. त्यामुळं पुस्तक घरी आणल्यावर सवडीने वाचू म्हणून इतर पुस्तकांसोबत कपाटात ठेवून दिले. परवा ते बाहेर काढले व शेवटच्या पानावरचं शब्द रूपी आशीर्वाद पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांचे वाचले व प्रस्तावना वाचून पाठीमागून पुढे असा एक एक भाग वाचायला सुरवात केली.

आमचा वित्तविभागातील सहकारी मित्र असं काही लिखाण करेल असं कधी वाटलं नव्हते.

प्रत्येक भाग वाचताना आमचे मित्र समवयस्क असलेने आम्हालाही आमच्या भूतकाळात घेऊन गेले व त्याचा जीवनपट हा आमचाच आहे की काय असं वाचताना सतत वाटत राहिले. केवळ तीन दिवसात रोज एक दोन तास व तीन चार भाग असे करून संपूर्ण पुस्तक वाचून काढले.

लेखकाची स्मरणशक्ती, त्याचं वडिलधाऱ्यांवर, कुटुंबावर, गावकऱ्यांवर, शिक्षकांवर, मित्रांवर असलेले प्रेम व जिव्हाळा प्रत्येक भागांत दिसून येतो. लेखकाची भाषाशैली ओघवती असून पुस्तकातील प्रत्येक पात्रास व कथेस योग्य तो न्याय देण्याचा प्रामाणिक यशस्वी प्रयत्न केला आहे, त्यामुळं पुस्तक एकदा हाती घेतलं की ते संपूर्ण वाचनाची ओढ लावते. कोणताही भाग कंटाळवाणा वाटत नाही. लेखकाने आपली जवळजवळ साठ वर्षांची जीवन कहाणी कथन केलीय पण ती नुकतीच घडलीय की काय असा भास होतो.

अर्थात लेखकाच्या जीवनात आलेल्या प्रत्येकाचा उल्लेख जरूर होता की नाही हा चर्चेचा विषय होऊ शकतो.

लेखकांचे आपल्या गावाबद्दल वाटणारी आपुलकी व सामाजिक बांधिलकी पण ठळकपणे दिसते आणि लेखकाची नवीन ओळख करून देते.

आमच्या या नवोदित पण कसलेल्या लेखकास जीवन तरंगच्या यशासाठी व अशाच दर्जेदार लेखनासाठी खूप सदिच्छा!

निलेश ऱ्हाटवळ

श्री. निलेश ऱ्हाटवळ

नवोदित लेखक व ग्रामस्थ

जीवनतरंग !!

पेद्रेवाडी गावच्या राजकीय इतिहासात दोन विशाल वटवृक्ष फोफावले, ज्यांनी रखरखत्या उन्हात, बरसणाऱ्या पावसात, थंडीत, भिंगरीसारखे गरगर फिरुन पेद्रेवाडी गावाला आकार, आणि उकार दिला.... गोर गरीब जनतेला छाया आपलेपणाची ऊब दिली. आधार दिला, हक्क दिले. आत्मभान हरवलेल्यांना जागृत केले. असे दोन कुटुंबवत्सल वृक्ष म्हणजे मा. बाळासाहेब शिंत्रे & दुसरे लक्ष्मण गाडे साहेब (मुंबई पोलीस) या दोन वटवृक्षांनी केलेल्या महान कार्याबद्दल काहीसं..

'सुन्या सुन्या मैफलीच्या हळव्या आठवणी पासून ते गगन सदन तेजोमय' त्या करारी प्रार्थनेपर्यंत. आणि त्या प्रार्थने पासून ते गंजल्या ओठास माझ्या, धार वज्राची मिळू दे, या मागण्या पर्यंतचा उंबरठयातला अबोल पण निश्चयी असा पारिजात म्हणजे श्री बाळासाहेब शिंत्रे लिखित 'जीवन तरंग' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मा. प्राध्यापक प्रवीण दवणे, ज्येष्ठ साहित्यिक व कवी यांच्या शुभहस्ते दिनांक 12 डिसेंबर 2021 रोजी गुरव ज्ञानी हॉल येथे पार पडला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री विजय नाहटा साहेब शिवसेना उपनेते व अध्यक्ष झोपडपट्टी सुधार मंडळ, मा श्री विठ्ठल मोरे साहेब जिल्हा प्रमुख नवी मुंबई, श्रीमती संध्याताई वढावकर ठाणे जिल्हा संपर्क संघटक, श्रीमती शिल्पाताई सरपोतदार अध्यक्ष शिव सहकार सेना, श्री नजहत शेख संचालक, श्री व्ही.डी.पाटील अध्यक्ष आरसीएफ एक्स-एम्पलॉइज सोशल फोरम आणि शारदा प्रकाशनचे मा.प्रा. संतोष राणे, सौ नेत्रा पाटील (ढवळे) नगरसेविका पनवेल महानगरपालिका अशा बऱ्याच मान्यवरांची उपस्थिती लाभली.

पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ, बाळासाहेबांचे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी श्री विजय नाहटा साहेब, श्री. विठ्ठल मोरेसाहेब व व्यासपीठावर सर्व पाहुण्यांनी बाळासाहेबांचे बालपणीचे दिवस, शिक्षण घेत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करत RCF मध्ये सीनियर फायनान्स मॅनेजर पर्यंतची वाटचाल याबद्दल फारच कौतुक व प्रसंशा केली. त्यांनी नोकरी करत करत सामाजिक क्षेत्रात व राजकारणात जी कामगिरी केली त्याचा तरुण पिढीने जरूर आदर्श घ्यावा असेही सांगितले.

त्यांची पत्नी सौ रंजना शिंत्रे या 1995 साली प्रथम नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि तेव्हापासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहून नवी मुंबईमध्ये काम करत आहे, त्यामुळे शिंत्रे कुटुंब हे शिवसेनेचे भाग भांडवल आहे असा उल्लेख श्री. नाहटा साहेब यांनी केला.

याप्रसंगी मा. प्रा. प्रवीण दवणे यांनी आपल्या पहाडी व कवीमय आवाजामध्ये बाळासाहेबांच्या पुस्तकाला अनुसरून जे तेजोमय भाषण केले, कवितानि आणि परिपूर्ण भाषणाने पूर्ण व्यासपीठ जिंकले... सरांच्या शब्दाचा पाऊस चालू झाला आणि ज्ञान सभागृह ज्ञानाने भरून वाहू लागलं...

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मा.श्री. कवी साहित्यकार श्रीकांत चव्हाण, आदर्श शिक्षक येणारे गुरुजी, आणि माझा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये आम्ही तिघेही भरून पावलो!

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री अरुण अहिरे आणि दिलीप ढवळे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केले. शेवटी जिल्हा संघटक सौ रंजना शिंत्रे यांनी आभार प्रदर्शनपर भाषणात: "सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे उभा तुझ्या अंगणी स्वरांचा असेल हा परिजात आहे..." या कवितेच्या ओळी बोलून मॅडमनी सभागृहाची मनं जिंकली आणि कार्यक्रमाची सांगता केली!

जीवनकहानी वेगवेगळ्या प्रकारे प्रेरित करीत असते. या कहानीचे खरे नायक श्री. मा. बाळासाहेब आणि गाडे साहेब आहेत. अशा या महान माणसांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो. गणपती बाप्पा मोरया!! 🙏🙏

श्री. निलेश ऱ्हाटवळ
नवोदित लेखक व ग्रामस्थ

वसंत ढवळे

वसंत ढवळे

ग्रामस्थ व निकटवर्तीय नातेवाईक

मा. शिंत्रे साहेब,

मी आपले 'जीवन तरंग' हे आत्मचरित्र अगदी मनःपूर्वक वाचले. पुस्तक वाचताना असे वाटते की एखाद्या सराईत लेखकाचे हे लिखाण असावे, कारण त्यामधील शब्दांची जुळवा जुळव वाक्यरचना अतिशय उत्तम पद्धतीने मांडण्यात आले आहे.

प्रकाशन सोहळ्यामध्ये श्री. नाहटा साहेब बोलले की पुस्तक वाचायला सहा महिने लागले तरी चालेल पण वाचा, याचा अर्थच असा होता की मनःपूर्वक वाचा म्हणजे त्यामधील लेखकाचा जीवन संघर्ष आपल्या लक्षात येईल.

प्रकाशन सोहळ्यामध्ये काहीजण बोलले की आम्ही त्यांचा जीवन प्रवास जवळून पाहिला आहे, त्यामुळे पुस्तक वाचण्याची गरज नाही पण मी तर म्हणेन की काही मोजक्याच लोकांना तो माहित असेल पण सर्वांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे ज्यामुळे तुमचा संघर्ष माहित पडेल.

श्री. प्रवीण दवणे साहेब बोलले की हे पुस्तक तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल व ते अगदी सत्य आहे, हे पुस्तक वाचल्यावरच समजते.

असेच सुंदर लेखाण आपल्या हातून लिहिले जावे हीच सदिच्छा.

वसंत ढवळे यांचे हस्तलिखित पत्र
वसंत शिंत्रे

श्री. वसंत शिंत्रे

पोलीस उपनिरीक्षक आणि भाऊबंद

''जीवन तरंग'', लेखक-श्री. बाळासाहेब शिंत्रे यांचा पुस्तक प्रकाशन सोहळा मा. प्राध्यापक श्री प्रवीण दवणे यांच्या शुभ हस्ते पार पडला. सदर कार्यक्रम अत्यंत दिमाखात पार पडला.

''तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधु सखा तुम्ही हो'' खरतर तुमच्या आजी आजोबाची नावे माझ्या आईवडीलांच्या नावासारखी आहेत हे आता मला कळले. खरतर मी आज जो कांही आहे त्यामागे माझे आई वडील तसेच कुटुंबियांच्या आशीर्वादासह, आपण म्हणजे 1) श्री. बाळासाहेब शिंत्रे व 2) कै. शामराव कातकर यांच्या पाठींब्याने आहे. माझ्या प्रत्येक अडचणीच्या वेळी तसेच नोकरीचे वेळी आपण दोघानी मला भरपूर मदत केली आहे. त्यामुळे मी आपला फार ऋणी आहे. तसेच तुम्ही माझे आधारस्तंभ व आदर्श आहात.

''जीवन तरंग'' हे पूर्ण पुस्तक मी वाचले असून ते पूर्णत: जन्मभूमी व कर्मभूमी यावर आधारित आहे. मला असे वाटते की, आजरा तालुक्यातील मृत्युंजय कादंबरी, लेखक- कै. शिवाजी सावंत आणि आपण लिहिलेली ''जीवन तरंग'' ही वाचताना खाली ठेवूच नये असे वाटते. त्याप्रमाणे आपण लिहिलेली ''जीवन तरंग'' ही कादंबरी मी वाचून पूर्ण होईपर्यंत खाली ठेवलीच नाही.

आपण गावाबद्दल बरेच काही लिहिले आहे. साधारणपणे सन 1980-1985 पूर्वी ज्यांचे शिक्षण 10 वी पर्यंत झालेले असेल आणि ज्यांनी गावचे जीवन उपभोगलेले असेल त्यांनाच समजेल की, त्यावेळेचा गांव आणि आताचा गांव यात किती फरक आहे.

सौ. सुधा सुरेश चव्हाण

सौ. सुधा सुरेश चव्हाण

निवृत्त शिक्षिका आणि ग्रामस्थ

श्री बाळासाहेब वाकोजी शिंत्रे, कोपर खैरणे, नवी मुंबई – जीवन तरंग साठी शुभेच्छा.

श्री बाळासाहेबांचे 'जीवन तरंग' वाचण्यास सुरुवात केली आणि एकएक जीवन पटल समोर दिसावा असे झाले.

मी पाहिलेले अतिशय शांत आणि मनमिळावू बाळासाहेब इतके सुंदर लेखन करू शकतात, याबद्दल अभिमान द्विगुणित झाला.

आता थोडे 'जीवन तरंग' यात आलेले अनेक प्रसंग, अनुभव, निसर्ग वर्णन, आपल्या जन्मस्थळाविषयीची कमालीची जवळीकता इत्यादी वर्णन एखाद्या सराईत लेखकालाही जमणार नाही असेच आहे. एकएक प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहतात. आपण प्रत्यक्ष ते जीवन जगत आहोत असे सुखद अनुभव येतात.

आपण त्या प्रसंगात आहोत असाच भास होतो. आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो, ऐकतो की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते, तेव्हा तो पुरुष उत्तुंग यशाच्या शिखरावर पोहोचतो, पण मी तर वेगळे दृश्य प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यात आहेत ते म्हणजे बाळासाहेब!

आपल्या पत्नीला लग्नानंतर शिक्षण तर दिलेच पण प्रत्येक ठिकाणी मग ते राजकारण असो वा समाजकारण किंवा अन्य कोणतेही क्षेत्र, ते आपल्या लाडक्या पत्नीच्या म्हणजेच रंजनच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. आत्मविश्वास जागृत केला मला तर वाटते रंजनाताईच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

'जीवन तरंग' आणि बाळासाहेब खरेच काय त्यातील एक एक प्रसंग, अनुभव, दाखले, उदाहरणे अतुलनीय असेच हे लेखन आणि आपल्यातील लेखक जीवन तरंग मध्ये रेखाटला आहे. त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व मला आज जीवन तरंग यामध्ये अनुभवास आले. त्यांचे पुस्तक वाचताना एक समग्र जीवनाचा सारीपाट अनुभवला.

सौ. सुधा सुरेश चव्हाण
निवृत्त शिक्षिका आणि ग्रामस्थ

सुधा चव्हाण यांची हस्तलिखित प्रतिक्रिया – पृष्ठ १ सुधा चव्हाण यांची हस्तलिखित प्रतिक्रिया – पृष्ठ २
श्री. श्रीकांत चव्हाण

श्री. श्रीकांत चव्हाण

ज्येष्ठ कवी व साहित्यिक व ग्रामस्थ

नमस्कार, 🙏🙏 आदरणीय गुरूवर्य शिंत्रे साहेब,

आपण आणि आपल्या संपूर्ण शिंत्रे कुटुंबाने काल जो तुमच्या जीवन तरंग पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम केला तो आमच्या सर्वांसाठी एक अविस्मरणीय सोहळा होता.

मी बाहेर असल्याने अजून पुस्तक वाचनाचा योग आला नाही, मी त्याबद्दल नंतर व्यक्त होईनच, पण प्रविण दवणे सरांनी तुमच्यातील लेखकाचे जे विवेचन केले आहे ते ऐकूनच अंगावर काटा येत होता आणि माझं मन गावभर फिरत होतं.

त्यातच माझ्या सारख्या सामान्य माणसाला प्रविण दवणे सरांच्या हस्ते सन्मानित करून मला फार-फार उपकृत केले, त्याबद्दल मी आपल्या कुटुंबाचा ऋणी आहे. आपल्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित करण्याचा योग येऊ दे अशी प्रार्थना. त्याचबरोबर आम्ही तुमच्या दुसऱ्या पुस्तकाची वाट बघत आहोत, यासाठी आपणांस निरोगी आरोग्य आणि उदंड आयुष्य मिळो अशी सरस्वती चरणी प्रार्थना करतो.

आपला,
श्री. श्रीकांत चव्हाण
ज्येष्ठ कवी व साहित्यिक व ग्रामस्थ

श्री. सखाराम धों. तुरटे

श्री. सखाराम धों. तुरटे

अध्यक्ष, पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई

श्री. बाळासाहेब शिंत्रे यांच्या जीवन तरंग पुस्तकावर अभिप्राय कविता

सखाराम तुरटे यांची अभिप्राय कविता – पृष्ठ १ सखाराम तुरटे यांची अभिप्राय कविता – पृष्ठ २
श्री. मारुती कातकर

श्री. मारुती कातकर

कार्याध्यक्ष, पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई

🙏 सन्माननीय गुरुवर्य श्री बाळासाहेब शिंत्रे यांना माझा सादर प्रणाम

पेद्रेवाडी सुंदरवाडी गावामधील अष्टपैलू खेळाडू पैकी आपण एक अष्टपैलू आहात. साहेब काल जो कार्यक्रम जीवन तरंग पुस्तक वितरण सोहळा झाला तो आपला नसून आमच्या पेद्रेवाडी करांचा आहे असंच काही दिसून आलं कारण आपल्या गावचा आनंद सोहळा होता बाळासाहेब प्रेमी सर्व मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होते आपण पुस्तक रूपाने पेद्रेवाडीच्या प्रत्येक माणसाबद्दल त्याच्या गाठीभेटी बद्दल त्यांच्या कार्य कर्तुत्वयाबद्दल आपल्या पुस्तकामध्ये चांगल्या प्रकारे मांडणी केली त्यामुळे प्रत्येक आपला नागरिक आनंदी होऊन गेला.

💐साहेब आपली यशोगाथा आपल्या गावासाठी अशीच राहावी आणि आपल्या गावचे नाव सातासमुद्रा पर्यंत पोचवण्याचे काम आपण सर्वजण करू आणि हा प्रवास इथेच न थांबता अखंडित रहावा यासाठी आपणास दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व शुभेच्छा देतो 🙏🌹🌷🌺💐

श्री. मारुती कातकर
कार्याध्यक्ष, पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई

श्री. दिलीप ढवळे

श्री. दिलीप ढवळे

माझे मेव्हणे व ग्रामस्थ

बाळासाहेब शिंत्रे- बाळू या दोन शब्द म्हणजे पेद्रेवाडी गाव व नवी मुंबई मध्ये आपलं सामाजिक व राजकीय नाव कमावणारी व्यक्ती! प्रतिकूल परिस्थितीत आपले साम्राज्य उभे करणारे बाळासाहेब व त्यांचा जीवनप्रवाह हा खरोखरच शब्दांकित करण्यासारखाच आहे. माझे वडीलासारखे असणारे भाऊजी हे माझ्या वैयक्तिक जीवनात माझे आयडाॅल आहेत.

आर.सी.एफ. सारख्या नामांकित कंपनीत काम करत फक्त सामाजिक भावनेने लोकांची मने जिंकून घेऊन माझ्या ताईस (बहिणीस) १९९५ साली प्रथम नगरसेविका होण्याचा मान मिळवण्याचं सगळे श्रेय माझ्या भाऊजीना जाते. त्यानंतर तिच्या कर्तृत्वाने व वक्तृत्व शैलीमुळे ती आज नवी मुंबई जिल्हा संघटकपदी कार्यरत आहे. माझ्यासह माझ्या सर्व नातेवाईकांना सहारा देऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम हे बाळासाहेब या व्यक्तिनेच केले आहे.

पेद्रेवाडी गाव, आपले नातेवाईक व मित्रपरिवार त्यांच्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या व्यक्तिने जीवनातील आपला प्रवास व्यक्त केला आहे.

आज इंटरनेट किंवा व्हाॅट्स अॅप सारखी माध्यमं उपलब्ध आहेत. मी माझ्या नवीन पिढीला विनंती करेन की बाळासाहेब यांचं आत्मकथन आपण वाचावं व १९६०-७० चा तो काळ व आजची झालेली प्रगती याची तुलना तुम्हाला यातून दिसेल परंतु काळ कितीही बदलला असला तरी आपला गाव आपली माणसं याचा आदर व कदर जमिनीवर राहून कसा करावा हे बाळासाहेब या व्यक्तीकडून आपण आत्मसात करावा.

त्यांच्या जीवनाबद्दल बोलावं, लिहावं तेवढं थोडच आहे. परंतु एक पेद्रेवाडीकर म्हणून मला त्याचा रास्त अभिमान आहे.

श्री. दिलीप ढवळे
माझे मेव्हणे व ग्रामस्थ

श्री आबा शिंत्रे

श्री आबा शिंत्रे

पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई, सहसचिव

श्री बाळासाहेब शिंत्रे यांचे "जीवन तरंग" हे पुस्तक म्हणजे केवळ एक कथा नाही, तर तो एका समृद्ध अनुभवांचा प्रवास आहे. त्यांनी खेड्यातील साधी राहणी, मुंबईतील संघर्ष आणि खेड्याशी असलेली त्यांची नाळ अगदी जिवंतपणे मांडली आहे. या पुस्तकातून मिळणारा अनुभव हा नवयुवकांसाठी एक आदर्श ठरू शकतो आणि सर्वांनाच प्रेरित करतो. मी त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो.

तसेच बाळासाहेबांच्या पत्नी सौ. रंजना बाळासो शिंत्रे यांचा नवी मुंबई शिवसेना नगरसेविका ते जिल्हा संघटक होण्याच्या प्रवासात बाळासाहेबांचं योगदान आणि त्यांची खंबीर साथ तसेच त्यांचे मार्गदर्शन अगदी अनमोल राहिले आहे.

त्यांच्या संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर बाळासाहेबांनी त्यांना जी ताकद दिली, त्याचाच हा परिणाम आहे.

श्री. बाळासाहेब शिंत्रे यांच्या 'जीवन तरंग' या साहित्यातून आणि त्यांच्या पत्नीच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासातून आपल्याला सहकार्याची, समर्पणाची आणि खऱ्या प्रेमाची एक उत्तम प्रेरणा मिळते.

तसेच त्यांच्यातील एकसंघ प्रेम आणि त्यांनी समाजाला दिलेली सांगता, ही खरोखरच प्रेरणादायी आहे. जेव्हा पती-पत्नी दोघेही एकाच ध्येयाने प्रेरित होऊन समाजासाठी कार्य करतात, तेव्हा त्यांच्यातील प्रेम त्यांच्या कामाला एक वेगळीच ऊर्जा देते. त्यांचा हा प्रवास हे दाखवतो की, जर वैयक्तिक आयुष्यात भक्कम जोड असेल, तर सामाजिक क्षेत्रातही किती मोठे बदल घडवून आणता येतात.

धन्यवाद

श्री आबा शिंत्रे
पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई, सहसचिव

श्री. एम. एस. किरकिरा

आदर्श शिक्षक, दिवा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, दिवा

श्री. बाळासाहेब शिंत्रे यांच्या जीवन तरंग पुस्तकावर अभिप्राय

श्री. एम. एस. किरकिरा यांची प्रतिक्रिया – पृष्ठ १ श्री. एम. एस. किरकिरा यांची प्रतिक्रिया – पृष्ठ २

श्री. दत्तात्रय सुर्यवंशी

संपादक, प्रबोधन दिशा

बहु असोत सुंदर संपन्न की महा!
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!!

महाराष्ट्राची महती गाणाऱ्या या काव्यपंक्तीप्रमाणे सर्वगुण आणि सौंदर्यसंपन्न महाराष्ट्रातील काही सौंदर्य स्थळे आपणास नेहमीच खुणावत असतात. कोल्हापूर म्हणजे तर कलापूरच जणू! जन्माला यावं आणि एकदा तरी अंबाबाईची भेट व्हावी, ज्योतिबाला खेटे घालावेत ही प्रत्येकाची मनीषा असते. पन्हाळ्याला जावं अन् तिथली वीरश्री आणि शृंगार अनुभवावा, पश्चिम घाट पादाक्रांत करता करता विलोभनीय सौंदर्य नजरबंद करत थेट कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेकडील चंदगड किंवा आजरा मार्गाने आंबोली घाट उतरून कोकणाला आलिंगण द्यावं असं कोणाला बरे वाटणार नाही?

या आजरा-चंदगड तालुक्यातून साहित्याला एक नवा आयाम दिला. रणजित देसाई, शिवाजी सावंत, द. ना. गव्हाणकर, कलातपस्वी बाबूराव पेंटर यांचा वारसा असणारी ही लाल माती!

याच लाल मातीचा वसा आणि वारसा घेऊन 1954 साली पेद्रेवाडी नामक एका वाडीवस्तीत एक बीज रुजलं, हिरवाईची मुक्त उधळण असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वाढलं, विस्तारलं. संघर्ष जगता जगता दुःखाचा दागिना न करता लढत राहिलं. 'बाळू' हे पाळण्यातलं नाव, बाळून्या हे बोलण्यातलं नाव आणि बाळासाहेब हे स्वकर्तृत्वाने संपादन केलेलं नाव. हे बाळ कधीकाळी अधिकारी किंवा लेखक होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र उपजत असलेली बुद्धिमत्ता आणि परिस्थितीवर आरूढ होण्याची धमक यामुळेच ते वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात यशस्वी पुरुष ठरले.

'जीवन तरंग' या आत्मचरित्राच्या निमित्ताने बाळासाहेब शिंत्रे यांनी आपल्या गत अनुभवांना लेखणीबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याकाळी सातवीपर्यंत शिक्षण घेणं हेच ध्येय ठेवणारी पिढी पण त्या ध्येयापर्यंत काही मोजकीच मंडळी पोहोचत असत. त्या परिस्थितीवर मात करून त्यांनी प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण कसं पूर्ण केलं याचं सुरेख आणि ओघवत्या भाषेत केलेलं वर्णन वाचकाला निश्चितच मोहिनी पाडेल.

त्यांच्या जीवनात परीट गुरुजी सारखे शिक्षक लाभणं व 'कमवा आणि शिका' या रयत शिक्षण संस्थेच्या लेबर स्कीमचा विद्यार्थी होणं हा त्यांच्या नशिबाचाच भाग आहे. त्याचप्रमाणे आरसीएफ सारख्या नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळणं आणि रंजनासारख्या कर्तुत्ववान स्त्रीशी विवाह होणं हे विधिलिखितच म्हणावं लागेल.

या पुस्तकाला पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या शुभेच्छा लाभल्या आणि पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक व कवी श्री. प्रवीण दवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते श्री. विजय नाहटा साहेब तसेच अनेक मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. कोरोना काळ असूनसुद्धा प्रकाशन सोहळ्याला लोकांचा प्रतिसाद उत्कृष्ट होता.

श्री. दत्तात्रय सुर्यवंशी
संपादक, प्रबोधन दिशा

श्री. निवास जाधव

वाचक प्रतिक्रिया

श्री. बाळासाहेब शिंत्रे यांच्या जीवन तरंग पुस्तकावर अभिप्राय

श्री. निवास जाधव यांची प्रतिक्रिया – पृष्ठ १ श्री. निवास जाधव यांची प्रतिक्रिया – पृष्ठ २ श्री. निवास जाधव यांची प्रतिक्रिया – पृष्ठ ३
शिवाजी शिंदे

शिवाजी शिंदे

आर.सी.एफ. गुणवंत कामगार व शिवसेना पदाधिकारी

मी पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या दिवसीच पुस्तक घेतले होतं माझं वाचून पण झालं खूप छान. मी बरीच जीवनावर आधारित पुस्तके वाचली आहेत पण तुमच्या पुस्तकात घडून आणलेले म्हणजे (कृत्रिम) असे काही वाटले नाही सगळे प्रसंग प्रामाणिकपणे मांडले आहेत आणि तुम्ही आजी काका शिक्षक मित्र गरिबी परिस्थितीत काय भोगले ते कुठलेही दुःखात नाहीत तर सरळपणे सामना केला ते आणि खास करून गाव खेड्यातले सौंदर्य बालपण याचा चांगला मिलाप आहे त्यामुळे प्रत्येक वाचकाला आपल्या गावची व लहानपणाची आठवण येणारच आणि शहरातील मुलांना खेडेगांव पाहण्यासाठी ओढ लागेल यांत शंका नाही.

एकदंर सर्वच प्रसंग छान जुळून आणले बालपणापासून निवृत्ती पर्यंत सर्वच विषय छान मांडले खूप छान आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏💐💐💐

शितल देवरकर

शितल देवरकर

आदर्श शिक्षक व ग्रामस्थ

हार्दिक अभिनंदन साहेब... 💐💐💐

सर्वप्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो... ट्रेनिंगमुळे मला आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही... क्षमस्व!!!!

आम्हा सर्वांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे. आदरणीय शिंत्रे साहेब आपण आपल्या जीवन प्रवासात अनेक चढ उतार पाहिले... अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी यशाची शिखरे काबीज केली आहेत... हाच जीवन प्रवास आज 'जीवन तरंग' च्या माध्यमातून सर्वासमोर उलगडला आहे.

आपले हे जीवन तरंग आम्हा सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात तिळमात्र शंका नाही. तुम्हांला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!! 💐💐💐

गोविंद चव्हाण

गोविंद चव्हाण

माजी अध्यक्ष, पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई

गोविंद चव्हाण यांची प्रतिक्रिया
शंकर कातकर

शंकर कातकर

सीनियर सेक्शन इंजिनिअर व ग्रामस्थ

शंकर कातकर यांची प्रतिक्रिया – पृष्ठ १ शंकर कातकर यांची प्रतिक्रिया – पृष्ठ २
मीना राव

मीना राव

स्नेही

मला तुझा अभिमान आहे. तू तुझ्या येथपर्यंत येण्याचं क्रेडीट माझ्यासारख्या मित्रांना देतोस हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे.

तू आपल्या अति मेहनत, हसमुख, नो जेलस आणि सिन्सीयर कामामुळे या पोझिशनला पोहचलास.

प्रस्तावना छान आहे. अंतरीचे दोन शब्द खूपच टचिंग आहे. अजुन मी तुझ्या बालपणीला पोहचली आहे. छान प्रतिभाशाली लेखक आहेस तू!

मीना राव