बाळासाहेब शिंत्रे

🙏 आभार – ऋण स्वीकारणे

हे लिखाण केवळ माझ्या एकट्याचे नाही. यामागे अनेकांची साथ, प्रेरणा, समीक्षा व सहकार्य आहे.

💐 विशेष आभार

सौ. रंजना (पत्नी)

लिखाणासाठी वेळ देणारी व प्रोत्साहन देणारी साथीदार.

श्री. दिलीप जांभळे

RCF स्नेही – मौलिक मार्गदर्शन.

श्री. सर्जेराव कुईगडे

कोल्हापूर – समीक्षण व कौतुकाची थाप.

श्री. प्रमोद कर्नाड

प्रस्तावना लेखन, जे पुरस्कारासमान.

श्री. कृष्णा दावणे

मुखपृष्ठासाठी सहाय्य.

श्री. विश्वास येजरे

मुखपृष्ठ मदत व अक्षर जुळणी.

श्री. अविनाश कुलकर्णी

अक्षरजुळणी.

श्री. डी.एन. दिवेकर व श्री. प्रशांत सावंत

प्रूफ रीडिंग.

श्री. दिलीप ढवळे

अक्षर जुळणी.

"यांच्या ऋणात राहणं योग्य वाटतं.. परमेश्वराकडे एकच मागणं: हे प्रेम, आपुलकी, सहयोग निरंतर राहू दे."

पांडुरंग चरणी लीन होऊन.. लेखन सीमा!

— बाळासाहेब शिंत्रे

📢 पुस्तक प्रकाशन सोहळ्यावरील भाषण

जीवन तरंग - पुस्तक प्रकाशन सोहळा

बाळासाहेब शिंत्रे यांचे भाषण

जय महाराष्ट्र

आज माझ्या जीवन तरंग या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी उपस्थित ज्येष्ठ साहित्यिक व कवी सन्माननीय प्राध्यापक प्रवीण दवणे साहेब, उपनेते विजयजी नाहटा साहेब, जिल्हाप्रमुख विठ्ठलजी मोरे साहेब, जिल्हाप्रमुख द्वारकानाथजी भोईर साहेब, ठाणे जिल्हा संपर्क संघटक श्रीमती संध्याताई वढावकर मॅडम, शिव सहकार सेनेच्या अध्यक्षा शिल्पाताई सरपोतदार मॅडम, ज्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली त्या आरसीएफच्या डायरेक्टर फायनान्स नजहत शेख मॅडम, माझं लिखाण चाललं असताना ज्यांचं मार्गदर्शन लाभले ते प्रकाशक प्राध्यापक संतोष राणे साहेब, आमच्या आर.सी.एफ. एक्स एम्प्लॉईज सोशल फोरमचे अध्यक्ष श्री. व्ही. डी. पाटील साहेब, माझी मेहुणी नगरसेविका नेत्रा पाटील, माझे एक्स बाॅस श्री घाडगे साहेब, ज्यांच्यामुळे मी आर.सी.एफ. मध्ये लागलो ते सनन्मानीय बाळ वडवलीकर, मान्यवर व्यासपीठ आणि माझ्या विनंतीला मान देऊन हजर असलेले पेद्रेवाडी ग्रामस्थ, आर.सी.एफ. मधील अधिकारी गण व कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कोल्हापूरवासीय आणि बंधू-भगिनींनो आणि मित्रांनो!

कोरोनाचे निर्बंध असूनही आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या पुस्तक सोहळ्याला हजर राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे आमच्या कुटुंबाच्यावतीने मनापासून स्वागत करतो.

कोरोना मार्च २०२० च्या दरम्यान चालू झाला. त्यामुळे आपल्या सर्वांना जो बंदिवास लाभला, त्यामुळे घरी बसून काय करायचे हा प्रश्न तुमच्यासारखा मलाही पडला. तसं पाहिलं तर मला लहाणपणापासूनच वाचनाची आवड होती, पण मी अकाउंटमध्ये काम करत असल्याने तसेच इतर कामाच्या व्यापामुळे वाचण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. या कोरोनाच्या महामारीमुळे जो रिकामी वेळ मिळाला त्या आमच्या घरी असलेल्या बुकशेल्फ मधली बरीचशी पुस्तके वाचनात आली. काही आत्मचरित्रं वाचणात आली. मोबाईलवर येणारे लेख वाचले.

वाचता वाचता आपणही काहीतरी लिहावे असे वाटले आणि मी लिहायला सुरुवात केली, त्याला सर्वांनी सहकार्य केले आणि त्यातून हे पुस्तक तयार झाले. ज्यांनी ज्यांनी मला हे पुस्तक लिहिताना सहकार्य केले त्यांना धन्यवाद देतो.

कोल्हापूर जिल्ह्यातील एका पेद्रेवाडी या छोट्याशा गावात व सर्वसामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. माझं गाव गर्द वनराईने नटलेले आणि देवराईने घेरलेले असल्यामुळे सर्व ऋतुत आल्हाददायक आणि हवेहवेसे वाटणारे आहे अशा निसर्गरम्य गावात मला जन्माला येण्याचे भाग्य लाभले हे माझं नशीब समजतो.

माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी म्हणजे खेड्यापाड्यात राहणाऱ्या सर्वच कुटुंबासारखी होती, मात्र आमच्या कुटुंबामध्ये जे प्रेम व जिव्हाळा मिळाला तो मात्र वेगळाच! अशा प्रेमळ कुटुंबात माझा जन्म झाला त्याबद्दल मी मला भाग्यवान समजतो.

त्यावेळेस गावातल्या सगळ्याच मुलांचं जास्तीत जास्त सातवीपर्यंत शिकायचं ध्येय असायचं. पण सातवी पर्यंत पण फार कमी मुलांना पोहचता यायचं. माझी परिस्थिती सातवीपर्यंत शिक्षण घेण्याची निश्चित नव्हती पण माझ्या नशिबानं साथ दिली आणि मी पदवीपर्यंत कसा पोहचलो ते मी माझ्या पुस्तकात लिहिलं आहे ते तुम्हाला कळेलच. त्यावेळी प्राथमिक शिक्षण घेताना परीट गुरुजींचा परिसस्पर्श झाला. तसेच हायस्कूलमध्ये देसाई सरांच्या कडक शिस्तीमुळे मी घडलो. अशा सर्व गुरुजणांना मी वंदन करतो. त्यानंतर सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या 'कमवा आणि शिका' या लेबर स्कीमच्या माध्यमातून माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर मी आरसीएफमध्ये 38 वर्षे नोकरी करून सिनियर फायनान्स मॅनेजर म्हणून निवृत्त झालो.

पेद्रेवाडी ही माझी जन्मभूमी आणि आर.सी.एफ. ही माझी कर्मभूमी. मी जी काही माझ्या जीवनात प्रगती केली आहे ती केवळ आरसीएफ कंपनीमुळेच! पेद्रेवाडी ते आर.सी.एफ. या प्रवासाचं खरं श्रेय मी माझ्या दोन्ही ज्येष्ठ बंधूना देतो.

आज माझ्या आयुष्याला जी स्थिरता लाभली आहे, ती फक्त रंजनाच्या मेहनतीने व कष्टाने साठवलेल्या प्रत्येक गोष्टींमुळेच. त्यात तिच्या काटकसरीचे कौतुक जेवढं करावं तितकं कमीच आहे. ती एवढया मोठ्या पदावर असूनही घरात येताना ती राजकारणाची चप्पल बाहेरच काढून येते आणि घरी गृहिणी म्हणून सर्व कामे करते. माझ्या या खडतर जीवनात रंजनाने दिलेली साथ अनमोल आहे. आयुष्याच्या या अवघड वाटेवर तिने दिलेल्या साथीमुळेच मी आयुष्याच्या ह्या सुखमय शिखरावर पोहचलो.

हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा.ना. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या प्रेरणेने आम्हाला २७ वर्षांपासून शिवसेनेचे पाईक होण्याचं भाग्य लाभले.

आतापर्यंत आपण ऐकतो की आत्मचरित्र म्हटलं की ते एखाद्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचं फक्त पण सर्वसामान्य व्यक्तींनी सुध्दा आपले आत्मचरित्र लिहावं अशी संकल्पना घेऊन या पुस्तकाचा जन्म झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आठवणींचा पेटारा उघडून बघावा आणि आपल्या मनाची बॅटरी चार्ज करावी असा एक नवीन पायंडा पाडण्याचा मी यातून प्रयत्न केला आहे. हे पुस्तक म्हणजे माझा जीवन प्रवास असून आयुष्याची गोळाबेरीज पुस्तकरुपाने तुमच्यासमोर ठेवताना मला आनंद होत आहे.

हे पुस्तक म्हणजे ज्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या त्यांच्यासाठी हे भावरूपी शब्दपुष्पच आहे.

या पुस्तकाचं मुद्रण माझ्या विद्यानगरीत म्हणजेच साताऱ्यात करण्याचा योग आला त्यामुळे या पुस्तकाला माझ्या दृष्टीने वेगळं महत्व प्राप्त झाले आहे. अजून एक विशेष बाब म्हणजे हे पुस्तक माझ्या कॉलेजच्या खास मित्राघ्या मुलाच्या प्रिटिंग प्रेसमध्ये छापलं गेलं आणि त्ते त्यांच्या वाचनात आलं आणि ते इतका भारावून गेले की त्याचं वर्णन करणं कठीण आहे. सांगायचे तात्पर्य काय की जर हे पुस्तक माझ्या संबंधित व्यक्तीने मनापासून वाचलं तर त्याचीही अशीच अवस्था होईल असं मला विश्वास वाटतो.

तसेच मी हे पुस्तक लिहिताना माझी पत्नी सौ रंजना, माझी मुलगी हर्षदा, मुलगा मिलिंद, सून रसिका, दुसरी सून प्रज्ञा या सर्वांनी मला प्रोत्साहन दिले. तसेच हे पुस्तक लवकरात लवकर चांगल्या प्रकारे प्रकाशित व्हावे यासाठी सुरुवातीपासूनच विश्वास येजरे आणि माझे मेव्हणे दिलीप ढवळे यांनी मनापासून तळमळ दाखवली आणि सर्वतोपरी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अशा बर्याच व्यक्तींनी मला जीवनात अशीच साथ दिली त्या सर्वांचा उल्लेख मी माझ्या पुस्तकात करण्याचा प्रयत्न केला आहे.

माझे आर.सी.एफ.मधील स्नेही श्री दिलीप जांभळे, कोल्हापूरचे मित्र सर्जेराव कुईगडे तसेच श्री प्रमोद कर्नाड यांनी मी पुस्तक लिहिताना चांगलं सहकार्य केले. तसेच अविनाश कुलकर्णी यांची अक्षर जुळणी आणि आमच्या गावचे आदर्श शिक्षक श्री विश्वास येजरे यांची शब्द रचना, मुखपृष्ठ संकल्पना यामुळे या पुस्तकाला चांगला आकार आला. तसेच शारदा प्रकाशनचे प्राध्यापक संतोष राणे यांनी वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन लाभलं. तसेच आरसीएफमधील सीनियर सिटीजनच्या एवरग्रीन ग्रुप मधील राजेंद्र जोशी, सुनील कवळे, घाडगे साहेब अशा सगळ्यांनीच चांगलं प्रोत्साहन दिले. याचप्रमाणे माझे कॉलेजचे मित्र श्रीनिवास जाधव व त्यांचे चिरंजीव स्वप्नील जाधव जे या पुस्तकाचे मुद्रक आहेत त्यांनी या पुस्तकाला फायनल टच दिला.

सगळ्यात विशेष म्हणजे माझ्या पहिल्या वहिल्या पुस्तकाला पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ या यांचा शब्दरूपी आशीर्वाद म्हणजे साक्षात सरस्वतीने माझ्या झोळीत टाकलेले अक्षरदानच होय आणि ते दोन शब्द म्हणजे माझ्यासाठी मिळालेला तो पुरस्कारच समजतो. त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यापेक्षा मला त्यांच्या ऋणातच राहणे पसंत करतो.

या सगळ्यांचा कळस म्हणजे आजच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे लाभले ते साहित्यक्षेत्रात एका वेगळ्या उंचीवर आहेत, अशा ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रवीण दवणे यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचे प्रकाशन म्हणजे दुग्धशर्करा योगच आहे. यामुळे मी पुस्तक लिहिण्याचा जो घाट घातला त्याचं सार्थक झाल्याचं समाधान मला लाभल. म्हणून माझ्या आयुष्यातील हा दिवस सुवर्णअक्षराने लिहिण्यासारखा आहे आणि तो माझ्या कायम लक्षात राहील.

माझे दोन शब्द संपवण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना एक विनंती करत आहे की हे पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचावे आणि वाचल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचाव्यात ही छोटीशी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

— बाळासाहेब वाकोजी शिंत्रे