आमच्याबद्दल
बाळासाहेब वाकोजी शिंत्रे – निवृत्त वरिष्ठ वित्त व्यवस्थापक, शिवसैनिक, लेखक
'जीवन तरंग' आत्मचरित्राचे आर.सी.एफ. (RCF) मधील हस्तलिखित प्रथम पान
तरुण बाळासाहेब शिंत्रे – आर.सी.एफ. (RCF) येथे रुजू होताना (१९७४)
परिचय
निवृत्त वरिष्ठ वित्त व्यवस्थापक, आर.सी.एफ. लि.
गेली २७ वर्षे मी व माझी पत्नी रंजना यांनी शिवसेनेचे कार्य नवी मुंबई व कोल्हापूर जिल्ह्यात केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेने ही सेवा साधली. निवृत्तीनंतर लिखाण हा माझा ध्यास झाला. मराठी शाळेत शिकलो, पण नोकरीमुळे लिखाण कमी झाले. कोरोनाच्या बंदीवासाने मला संधी दिली – आणि 'जीवन तरंग' उतरले.
आयुष्यातील सुख-दु:ख, यश-अपयश यांचे हे प्रतिबिंब आहे. आठवणी म्हणजे फुले – केव्हाही हाताळा, सुगंध देतात.
बालपण आणि शिक्षण
बाळासाहेबांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील पेद्रेवाडी या छोट्याशा ग्रामीण भागात झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, चिमणीच्या अंधुक प्रकाशात अभ्यास करत त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी डॉ. शंकरराव उत्तुरे हायस्कूल (हिरण्यकेशी शिक्षण प्रसारक मंडळ) येथे प्रवेश घेतला, जिथे त्यांचा सांस्कृतिक आणि बौद्धिक पाया रचला गेला. पुढे त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी अत्यंत मेहनतीने संपादन केली.
व्यावसायिक कारकीर्द (आर.सी.एफ.)
उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर, १६ एप्रिल १९७४ रोजी ते आर.सी.एफ. (RCF Ltd.) मध्ये रुजू झाले. आपल्या बुद्धिमत्ता आणि सचोटीच्या जोरावर त्यांनी वित्त विभागात सतत प्रगती केली आणि वरिष्ठ वित्त व्यवस्थापक (Senior Finance Manager) या महत्त्वाच्या पदावरून २०१४ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या ४० वर्षांच्या या प्रवासात त्यांनी कामाचा आणि नात्यांचा एक उत्तम समतोल साधला.
पन्नास वर्षे समाजसेवेची
१ जून २०२६ रोजी श्री. बाळासाहेब शिंत्रे यांचा ७२ वा वाढदिवस साजरा होत आहे. या निमित्ताने त्यांच्या गेल्या पन्नास वर्षांच्या सामाजिक, संघटनात्मक आणि सार्वजनिक कार्याचा आढावा घेताना मन अभिमानाने आणि कृतज्ञतेने भरून येते.
माझे घर त्यांच्या गावातील घराजवळच असल्यामुळे मला त्यांना अत्यंत जवळून पाहण्याची आणि त्यांच्या कार्याचा साक्षीदार होण्याची संधी लाभली. आयुष्यभर त्यांनी प्रामाणिकपणा, निष्ठा, पारदर्शकता आणि समाजहिताची जाणीव जपत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा, मार्गदर्शन आणि बळ मिळाले आहे.
त्यांच्या ‘जीवन तरंग’ या आत्मचरित्रातील नोंदी, त्यांनी स्वतः दिलेली माहिती तसेच मला ज्ञात असलेल्या अनेक घटनांच्या आधारे, त्यांच्या पन्नास वर्षांच्या समाजसेवेचा हा शब्दरूपी गौरव करण्याचा माझा अल्पसा प्रयत्न आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञतेची भावना व्यक्त करत, ‘५० वर्षे समाजसेवेची’ हा शब्दसुमनांचा पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे.
मे १९७५ मध्ये साताऱ्यातील रयत शिक्षण संस्था संचलित 'धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स' या कॉलेजच्या पहिल्या बॅचमधून त्यांनी पदवी संपादन केली आणि नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आगमन झाले.
गेल्या पाच दशकांत त्यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि संघटनात्मक संस्थांमध्ये अत्यंत जबाबदारीने काम केले. १९७५ साली प्रथमच १५ ऑगस्ट रोजी गावच्या ग्रामस्थ मंडळाच्या सभेला उपस्थित राहण्याचा योग आला. त्या सभेत त्यांची इरिगेशन स्कीम अंतर्गत हिशोब तपासणीस पदावर निवड झाली. या क्षणापासून वयाच्या २१ व्या वर्षी त्यांच्या समाजकार्याच्या प्रवासाची खरी सुरुवात झाली.
१९७७ साली राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आर.सी.एफ.) या भारत सरकारच्या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात बाळासाहेबांना नोकरीची संधी मिळाली. नोकरीसोबतच त्यांनी आर.सी.एफ. मध्ये सामाजिक व संघटनात्मक कार्यातही मोठे योगदान दिले. आर.सी.एफ. रुरल स्पोर्ट क्लबमध्ये खजिनदार, आर.सी.एफ. ऑफिसर्स असोसिएशनच्या सेंट्रल कमिटीमध्ये खजिनदार म्हणून त्यांनी अत्यंत जबाबदारीने काम पाहिले. तसेच निवृत्त झाल्यानंतर आर.सी.एफ. एक्स एम्प्लॉईज सोशल फोरममध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काही वर्ष काम पाहिले आणि सध्या ते सदर फोरममध्ये सक्रिय कमिटी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
मे १९८२ मध्ये गावातल्या माझ्या क्लासमेट सौ रंजना यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि डोंबिवली मध्ये त्यांचा नवीन संसार सुरू झाला. त्यांना हर्षदा व मिलिंद अशा दोन गुणी मुलांचा लाभ झाला. सध्या त्यांची दोन्ही मुले इंजिनीयरची पदवी घेऊन परदेशी वास्तव्य करत आहेत.
१९८४ मध्ये वाशी येथे वास्तव्यास आल्यानंतर सी-२ टाईप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनच्या स्थापनेपासून श्री.बाळासाहेब सक्रिय राहिले.
सुरुवातीला खजिनदार व नंतर तब्बल पस्तीस वर्षे कोणत्या ना कोणत्या पदावर राहून सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी असोसिएशनची सेवा केली. सदर असोसिएशन यांच्या अध्यक्षतेखाली शुभम को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी मध्ये परिवर्तित करून त्यांनी पुनर्विकास प्रकल्पासाठी मॅनेजिंग कमिटी आणि रिडेव्हलपमेंट कमिटीसोबत सातत्याने प्रयत्न केले. त्याचे फलित म्हणून नुकतीच या २१ वर्षे रखडलेल्या भव्य प्रकल्पाला नवी मुंबई महानगरपालिकेकडून प्रकल्प बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र (CC) प्राप्त झाले आहे व हा प्रकल्प विकासकाच्या हस्ते लवकरात लवकर पूर्णतेस नेऊन सर्व सभासदांना टॉवर मधील नव्या अद्यावत घरकुलात सुखाने राहता यावे यासाठी प्रयत्नशील आहेत.
१९८५ साली ‘वैदिक विश्व’ या पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून वाशी सेक्टर १५ येथे उभारण्यात आलेल्या वास्तूमध्येही त्यांनी स्थापनेपासून सक्रिय सहभाग घेतला. गेल्या पंचवीस वर्षे खजिनदार म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. आज ही वास्तू ‘योगा कम कम्युनिटी सेंटर’ म्हणून प्रसिद्ध आहे.
१९९३ साली ‘कोल्हापूर जिल्हा उत्कर्ष संघ, नवी मुंबई’ या संस्थेच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कोल्हापूरवासीयांना एकत्र आणण्याचे कार्य त्यांनी केले.
हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने सौ रंजना शिंत्रे तीस वर्षे शिवसेनेसी एकनिष्ठ राहून नवी मुंबईमध्ये प्रत्येक कार्यक्रमांमध्ये पुढाकाराने भूमिका बजावत आलेली आहे. समाजातील प्रत्येक घटकाशी जपलेला स्नेह आणि विश्वास याच बळावर त्यांच्या पत्नी सौ. रंजना बाळासाहेब शिंत्रे यांनी १९९५ साली नवी मुंबई महानगरपालिकेत प्रथम नगरसेविका म्हणून निवडून यायचा मान पटकावला आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. पुढे शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. गेली अठरा वर्षे त्या 'शिवसेना नवी मुंबई जिल्हा संघटक' म्हणजेच महिला आघाडीच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
तद्नंतर १९९७ साली ग्रामदैवत श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुमारे १४ लाख रुपयांचा निधी लोकसहभागातून उभारण्यात आला. त्या समितीचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली.
सौ. रंजना शिंत्रे यांच्या पुढाकारातून १९९७ साली ‘हिरण्यकेशी शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेच्या माध्यमातून सरंबळवाडी ता. आजरा जि. कोल्हापूर येथे हायस्कूल सुरू करण्यासाठी मान्यता मिळवली. शासनाकडून दोन एकर जागा मिळवून स्थानिक संचालकांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेची भव्य इमारत उभारण्यात आली. त्यामुळे चार ते पाच किलोमीटर अंतरावरून नाला-ओढ्यातून शिक्षण घेण्यासाठी मुलांना यावे लागत होते. विशेष करून मुली शिक्षणापासून वंचित राहत होत्या. या हायस्कूलमुळे गरीब व शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षणाची फार मोठी सुविधा झाली. गेल्या २८ वर्षांपासून कै. शंकरराव उत्तुरे हायस्कूल अत्यंत यशस्वीपणे कार्यरत असून संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. रंजना शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या या हायस्कूलमध्ये एस.एस.सी. परीक्षेचा निकाल दरवर्षी शंभर टक्के लागण्याची गौरवास्पद परंपरा कायम आहे.
१९९८ साली 'पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ' संचलित ‘श्रम साफल्य सहकारी पतसंस्था’ या नियोजीत संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा बाळासाहेबांनी स्वीकारली. ग्रामस्थ मंडळ आणि पतसंस्थेचे अधिकृत रजिस्ट्रेशन करून 'संस्थापक अध्यक्ष' म्हणून सलग पंधरा वर्षे संस्थेचा कार्यभार प्रभावीपणे सांभाळला. त्यावेळी मला काही ग्रामस्थ त्यांचा उजवा हात म्हणायचे. त्यांनी माझे वडील श्री शशिकांत चव्हाण यांना सामाजिक क्षेत्रातील गुरु मानलेले आहे. त्याचप्रमाणे माझ्या सामाजिक क्षेत्रात मी त्यांना गुरु मानलं आहे. त्यांची पत्नी सौ रंजना शिंत्रे या या शिवसेनेमध्ये सुरुवातीपासून सक्रिय आहेत, तरी गावच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांनी कधीच राजकारण येऊ दिले नाही, म्हणूनच मी त्यांच्या नेहमी पाठीशी राहिलो. २००३ साली अध्यक्ष असताना श्रम साफल्य पतसंस्थेसाठी बी.डी.डी. चाळीत स्वतंत्र खोली खरेदी करण्यात आली. आज त्या जागेच्या अर्ध्या भागातून संस्थेला नियमित भाडे उत्पन्न मिळत असून उर्वरित भागात संस्थेचे कामकाज सुरू आहे. या दूरदृष्टीपूर्ण निर्णयामागे बाळासाहेबांचा मोठा वाटा आहे. सदर संस्थेमध्ये आजही कार्याध्यक्ष म्हणून संस्थेच्या प्रगतीसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
नगरसेविका झाल्यानंतर सौ रंजना शिंत्रे यांच्या सहकार्याने आमच्या तालुक्याची आजरा बँक नवी मुंबईमध्ये आणण्याबद्दल या उभयतांनी मनात आणलं आणि त्या अनुषंगाने बँकेचे सर्वेसर्वा कै. काशिनाथ चराटी आण्णा आणि कै. माधवराव देशपांडे यांच्याशी संपर्क साधून २००० मध्ये आजरा बँकेची कोपरखैरणे नवी मुंबई येथे शाखा उघडण्यात त्यांना यश आले.
२००९ साली ‘राजर्षी शाहू कोल्हापूर विकास प्रतिष्ठान’ या पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून तत्कालीन मंत्री मा. श्री. विनयजी कोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्क, दादर येथे कोल्हापूरवासीयांसाठी “न भूतो न भविष्यती” असा भव्य ‘कोल्हापूर भवन’ उभारण्याच्या उद्देशाने तीन लाख कोल्हापूरवासीयांचा ऐतिहासिक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या भव्य उपक्रमात खारीचा वाटा उचलत ‘नवी मुंबई शहर प्रमुख’ म्हणून नवी मुंबईतून तब्बल ३५ बसेस भरून कोल्हापूरकरांना मेळाव्यासाठी घेऊन जाण्याचे यश मिळाले.
गावाच्या दक्षिणेला डोंगरात असणाऱ्या काळम्मा देवी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुमारे २० लाख रुपयांचा निधी लोकसहभागातून उभारण्यात आला. या उपक्रमातही सक्रिय योगदान देत मंदिराच्या पुनर्बांधणीच्या कार्यात सहभाग नोंदवला.
श्री. बाळासाहेब शिंत्रे यांच्या निवृत्तीनंतर त्यांनाही शिवसेनेच्या प्रमुख प्रवाहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. २०१७ साली अकोला (पश्चिम) विधानसभा संपर्कप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून ते संघटनात्मक बांधणीसाठी सातत्याने कार्यरत आहेत.
बाळासाहेब शिंत्रे यांचा संपूर्ण जीवनप्रवास पाहिला तर समाजकार्य, संघटनात्मक बांधिलकी, आर्थिक पारदर्शकता आणि लोकांप्रती असलेली आत्मीयता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रमुख पैलू ठरतात. त्यांनी आयुष्यभर पदासाठी नव्हे, तर समाजासाठी काम केले. अनेक संस्था उभ्या राहिल्या, अनेक उपक्रम यशस्वी झाले, अनेकांना आधार मिळाला—त्यामागे त्यांचे शांत, संयमी आणि सातत्यपूर्ण कार्य आहे.
आज त्यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!